मावळ, पुणे / रणजित जाधव : धुळवड खेळून झाल्यावर मित्रांसोबत रंग धुण्यासाठी नदीवर गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाची ही धुळवड अखेरचीच ठरली. नदीवर गेलेले काही तरुण इंद्रायणीत नदीत उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने काही क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि तरुण बुडाला. पुण्यातील मावळमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. जयदीप पुरुषोत्तम पाटील असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत तरुण मूळचा जळगाव जिल्ह्यातील तारखेड गावातील रहिवासी आहे. शिक्षणासाठी तो पुण्यात राहत होता.
याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थी वराळेमधील डॉ. डी.वाय. पाटील महाविद्यालयात शिकत आहेत. या घटनेमुळे पुण्यासह जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
डी.वाय. पाटील महाविद्यालयातील सात ते आठ जणांचा ग्रुप धुळवड खेळत होता. धुळवड खेळून झाल्यानंतर रंग धुण्यासाठी मावळमधील वराळे गावामधील इंद्रायणी नदी परिसरात सर्वजण गेले होते. यावेळी मयत जयदीप आणि त्याचे काही मित्र रंग धुण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने जयदीप पाटील याचा नदीत बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस आणि मावळमधील वन्यजीव रक्षक संस्थेतील स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली. मावळमधील वन्यजीव रक्षक संस्थेतील स्वयंसेवकांनी नदीतून मृतदेह बाहेर काढला. यानंतर एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा करत आकस्मात मृत्यू नोंद करत, शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला.