सार : सध्या गरमीचे दिवस आहेत. माणसं उकाड्याने हैराण आहेत. मात्र या उकाड्याच्या दिवसात ग्रामीण भागात वीज कपात सुरु आहे. अशीच एक घटना हरयाणात उघडकीस आली आहे. घरातील वीज गेली होती. उकाड्याने हैराण झाल्यामुळे पती-पत्नी घराच्या छतावर झोपले होते. मात्र उकाड्यापासून वाचण्यासाठी गेले आणि निसर्गाने प्राणच हिरावून नेले. दाम्पत्य रात्री छतावर झोपले असताना वादळ आले आणि वादळामुळे निर्माणाधीन भिंत कोसळली. यात दाम्पत्य जखमी झाले. भिंत कोसळल्याचा आवाज ऐकून कुटुंबीय धावत आले. कुटुंबीयांनी दाम्पत्याला तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सध्या देशभरात अवकाळी पावसाचे थैमान सुरु आहे. पावसामुळे संध्याकाळपासून परिसरातील वीज गेली होती. यामुळे नांगल चौधरी परिसरातील वॉर्ड नंबर 13 रहिवासी विजय आणि त्यांची पत्नी प्रेम देवी हे छतावर झोपले होते. मात्र रात्रीच्या सुमारास पुन्हा वादळ आले. यावेळी विजय यांच्या शेजारच्या घराची निर्माणाधीन भिंत पती-पत्नीच्या अंगावर कोसळली.
भिंत कोसळल्याचा आवाज आणि दाम्पत्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून घरचे छतावर धावत गेले. छतावर पाहतात तर पती-पत्नी भिंतीखाली कोसळलेल्या भिंतीखाली दबले होते. घरच्यांनी तात्काळ दोघांना सरकारी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयत जोडप्याला दोन मुलं आहेत. मयत विजय ई-रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. मुलं खाली घरामध्ये झोपल्यामुळे बचावली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला.