नाशिक : पोलीस ( Police ) कधी-कधी कारवाई करण्यासाठी काय करतील याचा काही नेम नसतो. त्यातच काही गुन्हे उघडकीस आणण्यासाठी किंवा सापळा रचतांना पोलीस शक्कल लढवत असतात. असाच एक प्रकार नाशिकच्या ग्रामीण पोलीस ( Nashik Rural Police ) दलातून समोर आला आहे. पोलीस अधिकाऱ्याने बनावट ग्राहक बनण्यासाठी वेशांतर करून बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्याला अटक केली असून बिबट्याच्या कातडीच्या ( Leopard Skin ) विक्रीचा डाव उधळून लावला आहे. ग्रामीण पोलीस दलातील पथकाने केलेली ही कारवाई सध्या चर्चेत आली आहे.
ग्रामीण भागात एक व्यक्ति बिबट्याच्या कातडीची विक्री करत असल्याची माहिती देवळा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून तो शेतकरी असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे देवळा पोलीसांनी ही कारवाई करण्यासाठी विशेष नियोजन केले होते.
देवळ्यातील खर्डे शिवारात बिबट्याची तस्करी होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी सापळा रचला होता.
बिबट्याची कातडी विक्री करणाऱ्या व्यक्तीलाच सहाय्यक पोलीस अधिकारी पुरुषोत्तम शिरसाठ यांनी फोन केला. मला कातडी खरेदी करायची आहे. त्यासाठी कुठे येऊ अशी विचारणा केली. त्यामध्ये त्याने निवाणबारीचा पत्ता दिला.
पोलीस अधिकारी शिरसाठ यांनी स्वतः ही कारवाई करण्याचे ठरविले. स्वतः पोलीसांचा गणवेश न घालता साधे कपडे परिधान केले. यामध्ये शिरसाठ यांनी वाहनदेखील दुसरे वापरले. आणि बाजूलाच असलेल्या ठिकाणी इतर कर्मचाऱ्यांना लपून बसण्यास सांगितले होते.
शिरसाठ यांनी बिबट्याची कातडी विक्री करण्यासाठी आलेल्या राजू वाळू जगताप याच्याशी व्यवहार सुरू केला. यामध्ये व्यवहार सुरू झाला. लाखाच्या वर आकडाही गेला आणि पोलीस अधिकाऱ्याने सहकाऱ्यांना इशारा केला.
राजू जगताप हा बिबट्याची कातडी विक्री करतांना रंगेहाथ सापडला. पोलिसांचा सापळा यशस्वी झाला आणि शिरसाठ यांच्यासह पथकाने अटक करून त्याच्याकडून बिबट्याची कातडी हस्तगत करण्यात आली आहे.
राजू जगताप याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाई शिरसाठ यांच्याबरोबर पथकात महेश शिंदे, आर. पी. गवळी, ज्योती गोसावी, सुरेश कोरडे, श्रावण देवरे यांचा समावेश आहे.
बिबट्याची कातडीही साधारणपणे दोन वर्षाच्या बिबट्याची असावी असा प्राथमिक अंदाज लावण्यात आला आहे. राजू जगताप हा शेतकरी असून या बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी आणखी कुणाचा सहभाग आहे याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.