यवतमाळ : पिकनिक एन्जॉय करुन हैदराबादहून यवतमाळला घरी परतत असताना गाडीचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात स्त्री रोग तज्ज्ञाचा मृत्यू झाला आहे. तर डॉक्टर पतीसह तीन जण जखमी झाले आहेत. डॉ. सुरेखा बरलोटा असे मयत महिला डॉक्टरचे नाव आहे. निर्मल ते हैदराबाद मार्गावरील टोल नाक्यापासून 12 किमी अंतरावर ही दुर्घटना घडली. जखमींना निर्मल येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सध्या दिवाळीची सुट्टी असल्याने डॉ. पियुष बरलोटा यांचे कुटुंब आणि त्यांच्या मित्राचे कुटुंब मिळून दोन वाहनातून हैदराबादला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. पिकनिक करुन यवतमाळकडे परतत असतानाच आज निर्मल हैदराबाद मार्गावर डॉ. बरलोटा यांच्या गाडीचे टायर फुटले आणि भीषण अपघात घडला.
या अपघातात डॉ. सुरेखा बरलोटा यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तात्काळ धाव घेत अन्य जखमींना गाडीतून बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. तर डॉ. पियुष बरलोटा यांची मुलगी आणि अन्य दोन जणींना गंभीर दुखापत झाली आहे. अन्य लोकांना किरकोळ दुखापत झाली.
निर्मल येथील शासकीय रुग्णालयात मृतक डॉ. सुरेखा पियुश बरलोटा यांच्या पार्थीवाचे शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरा सुरेखा यांचे पार्थिव यवतमाळात पोहोचण्याची शक्यता आहे.
पुणे-बंगलोर महामार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याची घटना आज घडली आहे. या अपघातात एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. कोल्हापूर जवळील उचगाव परिसरात हा अपघात झाला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.