लखीमपूर : वैवाहिक वादातून एका डॉक्टरने आपल्या वडिलांच्या मदतीने डॉक्टर पत्नीची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी डॉक्टरसह त्याच्या पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी डॉक्टरने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पत्नीचा मृतदेह 400 किमी दूर नेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले. अखेर 16 दिवसांनंतर हत्येचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले.
मयत डॉ. वंदना शुक्ला यांचा विवाह 2014 मध्ये डॉ. अभिषेक अवस्थीसोबत झाला होता. लग्नानंतर सीतापूर रोडवर स्वतःचे गौरी चिकित्सालय नावाचे रुग्णालय सुरु करुन दाम्पत्य प्रॅक्टिस करत होते.
मात्र काही दिवसांनंतर दोघांमध्ये वैवाहिक वाद सुरु झाले. त्यानंतर पत्नीने चामलपूर येथील लक्ष्मी नारायण रुग्णालयात प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे 26 नोव्हेंबर रोजी डॉक्टर दाम्पत्यामध्ये घरगुती वाद झाला.
वादादरम्यान अभिषेकने आपल्या वडिलांसह मिळून वंदनाला मारहाण सुरु केली. मारहाणीत जड वस्तूने वंदनाच्या डोक्यात प्रहार केला. यात वंदना गंभीर जखमी होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर त्याने पत्नीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये आणला. तेथे त्याने अॅम्बुलन्स बोलावली आणि मृतदेह 400 किमी दूर नेऊन तेथे अंत्यसंस्कार केले.
दुसऱ्या दिवशी 27 नोव्हेंबर रोजी अभिषेकने स्थानिक पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. घरातील किमती सामानही गायब असल्याचे अभिषेकने पोलीस तक्रारीत सांगितले.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता त्यांना दाम्पत्यामधील विवादाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अभिषेकवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. संशयावरुन 12 डिसेंबर रोजी अभिषेकला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.
गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी अभिषेक आणि त्याच्या वडिलांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.