पुणे : शहरामध्ये फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेला तिच्या मित्राने धोका देत तब्बल 69 लाख रुपयांना चुना लावल्याची घटना समोर आली आहे. महिलेला मित्राने त्याच्यासाठी कर्ज काढून देण्यास सांगितले होते. जे कर्ज काढणार, त्या कर्जाचा हप्ता वेळेवर भरणार असल्याचे वचन मित्राने महिलेला दिले होते. मित्राच्या शब्दावर महिलेने विश्वास ठेवला आणि त्याला आवश्यक असलेली स्वतःची कागदपत्रेही सुपूर्द केली. महिलेने ठेवलेल्या या विश्वासाचा मित्राने गैरफायदा घेतला. किंबहुना त्याच्या साथीदारांनी महिलेच्या कागदपत्रांच्या सहाय्याने विविध बँकांकडून कर्ज काढले. या माध्यमातून जवळपास 80 लाखांहून अधिक कर्ज काढण्यात आले.
मित्राने सुरुवातीला काही हप्ते भरले. मात्र नंतर हप्त्याची रक्कम भरण्यास टाळाटाळ केली. पुढे महिलेने हप्त्याचे पैसे मागितल्यानंतर तिला मित्राने धमकी देण्यास सुरुवात केल्याचेही उघडकीस आले आहेत. या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेचा मित्राने विश्वासघात केला. त्यामुळे तिला दरमहा जवळपास पावणे दोन लाख रुपयांच्या ईएमआयचा फटका बसू लागला. आरोपी मित्राने सुरुवातीला हप्ते भरणे चालू ठेवले होते. त्यानुसार त्याने 48 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड केली, मात्र उर्वरित रक्कम न भरल्यामुळे तक्रारदार महिलेला त्या कर्जाच्या हप्त्याचा भार सोसावा लागला. ज्यावेळी महिलेने मित्राला कर्जाच्या पैशांबाबत विचारणा केली, त्यावेळी मित्र आणि त्याच्या कुटुंबीयांनी महिलेला धमकी देण्यास सुरुवात केली. माझे काका पोलीस अधिकारी आहेत. माझ्याकडे जर पैशांसाठी तगादा लावला तर ते तुझ्यावर कारवाई करतील, अशी धमकी महिलेला तिच्या मित्राने दिली.
महिलेने फसवणुकीबाबत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी तिची तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर महिलेने न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी महिलेचा मित्र आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध एफआयआर दाखल करून अधिक तपास सुरू ठेवला आहे. आरोपींमध्ये तीन महिलांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.