पूर्णिया : दोघा मित्रांचा एकाच मुलीवर जीव जडला होता. यामुळे एकाने दुसऱ्याला आपल्या मार्गातून दूर करण्याचा कट रचला आणि तो यशस्वीही केला. पण कायद्यापुढे कुणी मोठा नसतो म्हणतात ना, तसेच झाले आणि अखेर पोलिसांनी आरोपींना अटक केली. पूर्णियातील बहुचर्चित मोहित रंजन हत्याकांडाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. मोहित रंजनची त्याच्याच मित्राने आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने हत्या केली. आरोपींकडून हत्येत वापरलेल्या लाठ्या-काठ्याही हस्तगत करण्यात आल्या आहेत. लव ट्रायंगलमधून मोहितची हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मोहितचा मित्र पियुषसह त्याच्या साथीदारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
मोहित एक मेडिकल स्टोअर्स चालवत होता. मोहित आणि पियुष दोघे मित्र असून, दोघांचेही एकाच मुलीवर प्रेम जडले होते. यावरुन पियुषचा मोहितवर राग होता. यामुळे मोहितला आपल्या प्रेमाच्या मार्गातून दूर करण्यासाठी पियुषने त्याच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार पियुषने 14 एप्रिल रोजी रात्री मोहितला कॉल करुन पार्टीच्या बहाण्याने बोलावले. तेथे मोहित आणि पियुषमध्ये वादावादी झाली. यानंतर पियुष आणि त्याच्या साथीदारांनी मिळून मोहितला मारहाण करत त्याची हत्या केली.
मोहितची हत्या केल्यानंतर आरोपींनी आत्महत्या भासवण्यासाठी त्याचा मृतदेह सौरा नदीत फेकला. तसेच त्याची बाईक आणि बॅग नदीकिनारी फेकली. यानंतर 16 एप्रिल रोजी बेलोरीजवळ सौरा नदीत मोहितचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत प्रकरणाचा तपास सुरु केला. त्याच दिवशी पोलिसांनी कसून तपास करत एका आरोपीला अटक केली. यानंतर पियुष, आलोक, कौशल आणि अमर कुमार सिंह यांना अटक केली.