मुंबई : गोवंडी परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशीच मित्रांनी तरुणाची हत्या केल्याची घटना गोवंडीतील शिवाजी नगर भागात बुधवारी रात्री घडली. साबीर अन्सारी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला अटक केली आहे, तर दोघे फरार आहेत. एक आरोपी अल्पवयीन आहे. साबिरच्या वाढदिवशी त्याच्या मित्रांनी डीजेचे आयोजन केले होते. पार्टी संपल्यानंतर त्यांनी साबिरला डीजेचे पैसे देण्यास सांगितले. मात्र साबिरने नकार दिल्याने मित्रांनी त्याची हत्या केली. याबाबत साबिरचे वडील युसूफ अन्सारी यांनी पोलिसात फिर्याद नोंद केली.
साबीरने त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी किमान 10,000 रुपये खर्च केले. यावेळी त्याच्या एका मित्राने पार्टीसाठी डीजेची व्यवस्था केली होती. पार्टी संपल्यानंतर मित्राने साबिरला डीजेचे पैसे देण्यास सांगितले. मात्र साबिरकडचे सर्व पैसे पार्टीत संपल्याने त्याने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे साबीरचे मित्र चिडले आणि भांडण सुरू झाले. यानंतर भांडण वाढत गेले आणि साबिरला धक्काबुक्की, लाथ मारण्यात आली. संशयितांपैकी सलामत याने शाहरुख या दुसऱ्या संशयिताकडून चाकू काढून साबीरच्या छातीत वार केला.
साबीरवर हल्ला करण्यासाठी शाहरुखने इतरांना प्रवृत्त केल्याचा अहवाल देत, साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार तो घटनास्थळावरून पळून गेला. साबीर रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. एका वाटसरूने त्याला ओळखले आणि त्याच्या वडिलांना ताबडतोब माहिती दिली आणि त्यांनी पोलिसांना कळवले. साबिरला तात्काळ शताब्दी म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तत्पूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.
चार संशयितांपैकी एक अल्पवयीन असून त्याला ताब्यात घेतले, तर एकाला अटक करण्यात आली. अन्य दोघे अद्याप फरार आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता आरोपी अहमदाबाद, गुजरात येथे पळून गेले आहेत आणि त्यांना पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे (युनिट-6) एक पथक तैनात करण्यात आले आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 109 (प्रवृत्त करणे), 302 (हत्या), 323 (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.