पुणे : जुन्नर (Junner) तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतात तयार केलेला माल व धान्य चोरी करणा-या 3 जणांच्या टोळी नारायणगाव पोलिसांनी (Narayangaon Police) ताब्यात घेतली आहे. खोडद (Khodad) येतील एका शेतकऱ्याचे तयार झालेले सोयाबीन घराजवळ असलेल्या पत्रा शेडमध्ये ठेवले होते. चोरट्यानी 50 किलो वजनाच्या 20 गोण्या चोरट्यांनी पळवल्या होत्या. या प्रकरणाची तक्रार नारायणगाव पोलिसांकडे करण्यात आली होती.
संदिप संभाजी उपशाम, अभिषेक शंकर मोरे आणि सुरज विलास भुतांबरे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार टोळीतील आरोपी पहिल्यांदा ब्रिझा गाडीने परिसर पाहून घेत होते. त्यानंतर रात्री उशिरा टॅम्पोच्या सहाय्याने घरासमोरील अंगणामधून आणि शेतामधील धान्याच्या गोण्या पळवायचे. त्याचबरोबर व्यापाऱ्यांना शेतकरी असल्याचे सांगून ते चोरीचा माल विकत होते.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींनी आतापर्यंत सोयाबीन, भुईमूग शेंगा, कांदे इत्यादी शेतकऱ्यांचा माल चोरल्याचे कबूल केले आहे. आरोपीनी चोरलेल्या गोण्यांपैकी 10 सोयाबीनच्या गोण्या हस्तगत केल्या आहेत. पोलिस आरोपींची कसून चौकशी करीत आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता आणखी काही दिवस पोलिस कस्टडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.