सीधी : जेवणावरुन झालेल्या वादातून पतीने मुलीसमोरच पत्नीला संपवल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यात घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पती घटनस्थळाहून फरार झाला आहे. घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी फरार पतीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. राम सजीवन कोल असे आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. आरोपी पतीला दारुचे व्यसन आहे. दारुच्या नशेत त्याने केलेल्या या कृत्यामुळे त्याची मुलगी आईच्या प्रेमाला पोरकी झाली आहे.
सीधी जिल्हा मुख्यालयापासून 15 किमी अंतरावर असलेल्या देवगढ गावात राम सजीवन पत्नी आणि मुलीसह राहत होता. राम सजीवनला दारुचे व्यसन होते. दारुच्या नशेत तो दररोज पत्नीशी भांडण करायचा. काही ना काही कारणातून पत्नीला मारहाणही करायचा. नातेवाईकांनी अनेकदा राम सजीवनला समजावले होते. मात्र तो कुणाचेही ऐकत नव्हता.
रविवारी रात्रीही तो नेहमीप्रमाणे दारु पिऊन घरी आला. दारुच्या नशेत पत्नीशी जेवणावरुन वाद घालायला सुरवात केली. वाद टोकाला गेला अन् राम सजीवनने पत्नी नवमीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे.