रायगड : तीन दिवस पत्नीने जेवण बनवले नाही म्हणून संतापलेल्या पतीने तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना छत्तीसगडमधील रायगडमध्ये घडली आहे. याप्रकरणी हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. सुंदर मोती कोरवा असे 30 वर्षीय मयत पत्नीचे नाव आहे तर लक्ष्मण कोरवा असे हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. क्षुल्लक कारणातून झालेल्या वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याने गावात खळबळ माजली आहे.
धर्मजयगडमधील गणेशपूर गावात लक्ष्मण कोरवा, त्याची पत्नी सुंदर मोती कोरवा आणि त्याची चार मुले राहतात. लक्ष्मण कोरवा हा मजुरीचे काम करतो. महिनाभरापूर्वीच तो मोलमजुरीसाठी गावातील काही लोकांसोबत तामिळनाडूला गेला होता. यानंतर 30 डिसेंबर रोजी तो घरी परतला.
घरी आल्यानंतर पतीने पाहिले की पत्नी घरी जेवण बनवत नाही, तसेच घरातील कामेही करत नाही. त्याने याबाबत गावातील पटेल कुंजराम कोरवा यांनाही सांगितले होते. यानंतर त्याने पत्नीला जेवण न करण्याचे कारण विचारले. मात्र तिने काहीच उत्तर दिले नाही.
पत्नी काहीच बोलत नसल्याने लक्ष्मणला आणखी राग आला. त्याने रागाच्या भरात पत्नीला थोबाडात मारली. यानंतर पत्नीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. यामुळे लक्ष्मणने भिंतीवर तिचे डोके आपटले. यात तिचा मृत्यू झाला.
गावातील ग्रामस्थ पटेल यांनी धर्मजयगड पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी सुंदर मोती कोरवा हिचा मृतदेह पडून होता. तिच्या डोक्यावर जखमेच्या खुणा होत्या.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी कुंजराम कोरवा यांच्या फिर्यादीवरून आरोपी लक्ष्मण कोरवा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नातेवाईकांचीही चौकशी करत आहेत.