धुळे : देशात सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरु आहे. दिवाळी (Deepawali) म्हटली की फटाक्यांची आतषबाजी आलीच. लहान मुलांना तर या फटाक्यांचे विशेष आकर्षण असते. मात्र फटाके फोडताना (Bursting Crackers) लहान मुलांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. थोडंस दुर्लक्ष केलं तर मुलं काय करतील हे सांगता येत नाही. यातून एखादी दुर्घटना घडण्याचा संभव असतो. अशीच एक दुर्घटना धुळे जिल्ह्यात (Dhule District) घडली आहे. या दुर्घटनेत एका मुलाचा आपला जीव गमवावा लागला आहे.
जुने धुळे येथे एका अल्पवयीन मुलाने फटाके फोडताना केलेल्या करामतीमुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे ऐन दिवाळीत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जुने धुळे येथे बरफ कारखाना परिसरात असलेल्या आदिवासी वस्तीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. सदर अल्पवयीन मुलगा फटाके फोडत होता. फटाके फोडताना त्याने सुतळी बॉम्ब लावला. यानंतर सुतळी बॉम्बवर स्टीलचा ग्लास ठेवला.
सुतळी बॉम्ब फुटताच त्यावरील स्टीलच्या ग्लासचे तुकडे झाले. यातील एक तुकडा त्या मुलाच्या छातीत घुसला. यात मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला.
रंगीबेरंगी पाऊस लावताना त्याचा स्फोट होऊन एक चिमुकला जखमी झाल्याची घटना सोमवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुण्यात घडली. पुण्यातील नव्हेमध्ये पाऊस लावताना त्याचा स्फोट झाला. यावेळी मुलगा थोडक्यात बचावला असला तरी, या स्फोटात मुलगा जखमी झाला आहे.