सुनील जाधव, कल्याण : सोशल मीडियाने तरुणाईला वेड लावले आहे. सोशल मीडियावर मैत्री करणे, प्रेमात पडणे या घटनांमुळे पालकांसह पोलिसांचीही डोकेदुखी वाढत आहेत. सोशल मीडियावर मैत्री करणे कल्याणमधील एका 15 वर्षाच्या मुलीला चांगलेच महागात पडले आहे. सोशल मीडियामुळे गुन्हेगारी वाढत असताना आता कल्याणात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलीशी ओळख करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये एक जण अल्पवयीन आहे. दरम्यान या घटनेमुळे पुन्हा डोंबिवलीमधील सामूहिक बलात्कार प्रकरण चर्चेत आल असून, या प्रकरणामध्येही सोशल मीडिया मुख्य धागा होता.
कल्याणमध्ये राहणारी 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी दोन दिवस घरी आली नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु करत मुलीचा शोध सुरु केला. तपासादरम्यान मुलगी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांना आढळली. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणत तिची चौकशी केली असता सर्व घटना उघडकीस आली.
मुलीची इन्स्टाग्रामवर एका तरुणाशी ओळख झाली. या तरुणाने मुलीला इन्स्टाग्रामवर संपर्क केला. यानंतर माझी गर्लफ्रेंड माझ्यावर संशय घेत आहे, तू घरी येऊन माझ्या गर्लफ्रेंडला भेटून आपलं असं काही नाही सांग, असे सांगितले. यानंतर मित्राच्या प्रेमसंबंधात वाद नको म्हणून मुलगी तरुणाला भेटायला उल्हासनगर येथे गेली. मात्र तरुणाची गर्लफ्रेंड तेथे नव्हती. यानंतर तरुणाने मित्रांसह मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकारामुळे मुलगी घाबरली आणि घरी काय सांगायचं या विचाराने घरी न जाता मैत्रिणीकडे गेली.
दुसरीकडे मुलगी घरी परतली नाही म्हणून तिच्या पालकांनी पोलिसात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला कल्याण स्थानक परिसरात मुलगी आढळून आली. यानंतर मुलीच्या जबानीवरुन पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. साहिल राजभर, सुजल गवळी आणि विजय बेरा अशी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे असून, चौथा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय घोडे हे करत आहेत.