छिंदवाडा : मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक अल्पवयीन मुलगी सात वर्षापूर्वी घरुन अचानक गायब झाली. याप्रकरणी घरच्यांनी पोलिसात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. तपासादरम्यान वडिल आणि भावाने मुलीची हत्या केल्याचे कोर्टात निष्पन्न झाले. याप्रकरणी वडिल आणि भावाला तुरुंगवासाची शिक्षा झाली. वडिलांना एक वर्षानंतर जामीन मिळाला, तर भाऊ अद्याप तुरुंगात शिक्षा भोगत आहे. यानंतर सात वर्षांनी मुलगी अचानक घरी हजर झाली. या घटनेमुळे घरच्यांसह पोलीसही चक्रावले.
मुलीची चौकशी केली असता तिने सांगितले की, ती रागाच्या भरात घरुन निघून गेली होती. आता ती सज्ञान झाली असून, तिचा विवाहही झाला आहे. सध्या ती पतीसोबत उज्जैनमध्ये राहते. मुलीने पोलिसांवर वडिल आणि भावाला खोट्या केसमध्ये अडकवल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दबाव टाकत वडिल आणि भावाला गुन्हा कबुल करण्यास भाग पाडले, असे मुलीने सांगितले.
सिंगोडी पोलीस ठाण्याअंतर्गत जोपनाला गावातील एक 15 वर्षाची मुलगी 2014 मध्ये अचानक घरुन बेपत्ता झाली. घरच्यांनी मुलीचा खूप शोध घेतला, पण मुलगी सापडली नाही. मग नातेवाईकांनी सिंगोडी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलीस मुलीचा लगातार शोध घेत होते. यानंतर सात वर्षांनी पोलिसांनी मुलीच्या घराजवळ खोदकाम केले. यावेळी एक सांगाडा आढळला.
पोलिसांनी न्यायालयात भावाने बहिणीची हत्या केली आणि वडिलांच्या मदतीने मृतदेह जमिनीत पुरल्याचे आपल्या अहवालात सांगितले. यानंतर वडिल आणि भावाला न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. वडिलांना एक वर्षानंतर जामीन मिळाला, मात्र भाऊ अद्याप तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
सात वर्षांनी मुलगी अचानक घरी परत आली. मुलीला जिवंत पाहून घरच्यांसह गावकरीही हैराण झाले. यानंतर मुलगी सिंगोडा पोलीस ठाण्यात गेली आणि सर्व हकीकत सांगितली. मुलगी जिवंत असल्याने पोलिसांना मिळालेला सांगाडा नक्की कुणाचा आहे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.