कल्याण : मुलीच्या वडिलांनी दम दिला म्हणून रागाच्या भरात 15 वर्षाच्या मुलाने 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी अवघ्या एक तासाच्या आत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. कल्याण स्टेशन परिसरामध्ये आज पहाटे ही धक्कादायक घटना घडली आहे.
मयत मुलीचे कुटुंब कल्याण स्टेशन परिसरात भीक मागते. आई-वडिल आणि चार मुले असे हे कुटुंब भीक मागत भटकंती करत ठिकठिकाणी राहते. तर आरोपी 15 वर्षाचा मुलगा हा भंगार गोळा करण्याचे काम करतो.
दीड महिन्यांपूर्वी मुलीच्या वडिलांचे आरोपीसोबत भांडण झाले होते. त्यावेळी मुलीच्या वडिलांनी त्याला दमदाटी करत मारहाणही केली होती. याचाच राग मनात धरत आरोपीने आज पहाटे 4 च्या सुमारास मुलीचे कुटुंबीय गाढ झोपेत असताना 8 वर्षाच्या मुलीला उचलून नेले.
आरोपीने मुलीला स्टेशन परिसरातील एका इमारतीत नेले आणि तिच्यावर अत्याचार करण्यास सुरू केला. मुलीने आरडाओरडा सुरू केल्यानंतर तिच्या ओढणीने तिचं तोंड दाबून आपल्याजवळ असलेल्या कटर ब्लेडने तिच्या गळ्यावर सपासप वार करत तिची हत्या केली.
हत्येनंतर तिच्या अंगावर ओढणी टाकून तिथून पळ काढला. सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान इमारतीतील लोकांनी त्या मुलीचा मृतदेह पाहिल्यानंतर हत्येची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी लगेचच आजूबाजूला तपास करत दोन भंगार वेचकांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवत विचारपूस केली. यावेळी त्यातील एका पंधरा वर्षाच्या मुलाने मुलीच्या वडिलांनी मारहाण केली म्हणून तिची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडील हत्येत वापरलेले कटर ब्लेड जप्त केले आहे.