दिल्ली : सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या 13 वर्षाच्या बालकाच्या संशयास्पद मृत्यूने दिल्लीत एकच खळबळ माजली आहे. आई-वडिल दोघेही बाजारात गेले होते. यावेळी 13 वर्षाचा मुलगा एकटाच घरी होता. आई-वडिल जेव्हा बाजारातून घरी परतले, तेव्हा मुलगा फासावर लटकलेला दिसला. तसेच मुलाच्या अंगावर मुलीचे कपडे आणि चेहऱ्यावर मेकअप केलेला होता. मुलाचा मृतदेह पाहून आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.
दिल्लीतील नजफगडमधील नंगली सक्रावती परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. आई-वडिल घरी नसताना मुलाने गळफास घेत आत्महत्या केली. विशेष म्हणजे मुलाच्या आई-वडिलांनी या मुलाला दत्तक घेतले होते. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.
मयत मुलगा सोशल मीडिया सक्रिय होता. सोशल मीडियावर रिल्स बनवायचा. याप्रकरणी पोलीस अनैसर्गिक संबंधांच्या बाजूनेही तपास करत आहेत. पोलिसांनी मुलाचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सही जप्त केले आहेत. तसेच आसपास लोकांकडे चौकशी करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मुलाने टोकाचे पाऊल का उचलले याबाबत पोलीस तपास करत आहेत.