नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीमध्ये सध्या वसईतील श्रद्धा वालकरचे हत्याकांड गाजत असतानाच आणखी एका भयानक हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. या हत्याकांडामागे पगाराचे क्षुल्लक कारण होते. पगार मिळाला नाही म्हणून घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीने पोलीस तक्रारीची धमकी दिली होती. त्याच रागातून मुलीला घरकामाला ठेवणाऱ्या आरोपीने मित्रांच्या मदतीने मुलीची निर्घृण पद्धतीने हत्या केली. त्यानंतर मुलीच्या मृतदेहाचे सहा तुकडे करून मृतदेह नदीमध्ये फेकून दिला.
वसईतील तरुणीचे हत्याकांड गाजले असतानाच हे आणखी एक भयानक हत्याकांड उजेडात आले आहे. त्यामुळे राजधानी नवी दिल्लीमध्ये महिलांच्या आणि तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आरोपीने त्याच्या घरात काम करण्यासाठी झारखंड येथून अल्पवयीन मुलीला आणले होते. मात्र तो हत्या झालेल्या मुलीला घरकामाचा मोबदला देत नव्हता. मुलगी मोबदला देण्यासाठी वारंवार पाठपुरावा करत होती.
कित्येक महिने पैसे मिळाले नाहीत म्हणून तिने पोलिसांमध्ये तक्रार देण्याची धमकी दिली होती. तिच्या या नाराजीनंतर आरोपीने घरकाम करणाऱ्या मुलीच्या हत्येचा कट रचला होता. त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने हा कट यशस्वी केला.
इतकेच नव्हे तर नंतर पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मुलीच्या मृतदेहाचे सहा तुकडे केले होते. चार वर्षांपूर्वी 17 मे 2018 रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष युनिटने आरोपीला अटक केली आहे.
अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्याकांडानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केली होती. मात्र हत्येचा कट रचणारा मुख्य आरोपी मागील चार वर्षांपासून फरार होता.
गेल्या चार वर्षांत विविध गुन्ह्यांमध्ये या हत्याकांडाचे कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी केला होता. अखेर मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला. शालू टोपणो असे या मुख्य मारेकर्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.