नांदेड : दारुसाठी मुलगा त्रास द्यायचा आणि मारहाण (Beating) करायचा म्हणून आईनेच त्याची सुपारी देऊन हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये उघडकीस आली आहे. सुशील श्रीमंगले (35) असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. तर शोभाताई श्रीमंगले असे हत्येची सुपारी देणाऱ्या आईचे नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील बारड येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी मुदखेड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तीन आरोपींना अटक (Arrest) केली आहे. राजेश पाटील आणि देवराव भगत अशी अन्य आरोपींची नावे आहेत. आरोपी हे मयताच्या घरात भाड्याने राहत होते.
शोभाताई श्रीमंगले ही आपल्या मुलासह मुदखेड तालुक्यातील बारड येथे राहत होती. शोभाताईच्या मुलाला सुशीलला दारुचे व्यसन जडले होते. तो काहीच कामधंदा करत नव्हता. दारुच्या आहारी गेला होता. दारुसाठी सतत आईला त्रास द्यायचा, शिवीगाळ आणि मारहाण करायचा. मुलाच्या या रोजच्या त्रासाला शोभाताई कंटाळल्या होत्या. यामुळे शोभाताई यांनी आपल्या घरात भाड्याने राहणाऱ्या राजेश पाटील आणि देवराव भगत यांना सुशीलला मारण्याची सुपारी दिली. हत्येसाठी 60 हजार रुपये द्यायचे ठरले होते. त्यापैकी 10 हजार रुपये शोभाताईंनी अॅडव्हान्स दिला होता.
राजेश पाटील आणि देवराव भगत यांनी सुशीलच्या डोक्यात वार करुन त्याची हत्या केली आणि मृतदेह बारड महामार्गाजवळ फेकून दिला. बारड महामार्गाववर एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी मयताची ओळख पटवण्यासाठी चौकशी सुरु केली. मयताच्या डोक्यात जखम असल्याने ही हत्या असल्याचे उघड झाले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह बारड गावातील सुशीलचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी याबाबत सखोल तपास केला असता राजेश आणि देवरावने सुशीलची हत्या केल्याचे उघड झाले. पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांची चौकशी केली असता मुलाच्या त्रासाला कंटाळून आईनेच त्याच्या हत्येची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी शोभाताईला अटक केले. (A mother killed a youth after getting tired of beating his son in Nanded)