हैदराबाद : सायबर क्राईमच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गुन्हेगार सायबर क्राईमचे नवनवीन मार्ग अवलंबत आहेत. अशीच एक सायबर क्राईमची (Cyber Crime) घटना हैदराबादमध्ये उघडकीस आली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तरुणी आणि महिलांचे फोटो टाकून (Young girls photo post on instagram) आक्षेपार्ह मजकूर (Offensive Matter) लिहून त्यांची बदनामी करत असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ग्रुपचे इन्स्टाग्राम पेज आहे. या पेजवर तरुणींना टार्गेट केले जाते. हा ग्रुप तरुणी आणि महिलांचे फोटो आणि व्हिडिओ बनवून त्यावर आक्षेपार्ह पोस्ट लिहायचे. या इन्स्टाग्राम अकाऊंट पेजचे 14 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.
अकाऊंटवर तरुणींचे फोटो आणि व्हिडिओ आक्षेपार्ह टॅग आणि कॅप्शनसह पोस्ट करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी सायबर टीमची मदत घेण्यात येत आहे.
कुठेही तरुणी दिसली तर व्हिडिओ बनवा आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करा, असे आवाहन या इन्स्टाग्राम पेजवर करण्यात आले आहे. या पेजवर तरुणींना बदनाम करणाऱ्या अनेक पोस्ट आहेत.
अशा प्रकारचे व्हिडिओ शूट करुन इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर लिंक करणारे 900 हून अधिक लोक आहेत. यामुळे या पेजचे फॉलोअर्स वाढत आहेत. याबाबत पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. या इन्स्टाग्राम अकाऊंट होल्डरचा शोध घेण्यात येत आहे.
हैदराबाद पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी कलम 506, 509, 354 (डी) आणि आयटी अधिनियम (64) अंतर्गत तीन गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी हैदराबाद पोलिसांची सायबर क्राईम टीमही तपास करत आहे.