उत्तर प्रदेश : सध्या मुंबई-महाराष्ट्रासह देशभरातील अनेक महानगरांमध्ये लेप्टो, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या रोगांचा फैलाव वाढला आहे. या रोगांचा सामना करताना मोठ्या प्रमाणावर रक्ताची आणि प्लेटलेटची गरज भासत आहे. मात्र ज्या प्रमाणात रुग्ण दाखल होत आहे, त्या प्रमाणात रक्त आणि प्लेटलेट्स उपलब्ध नाहीत. त्यामुळे रक्ताचा आणि प्लेटलेटचा काळाबाजार (Black market of platelets) सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यादरम्यान उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) प्लेटलेट्स म्हणून मोसंबीचा ज्यूस दिला जात होता, अशी माहिती एका रॅकेटच्या (Racket Exposed) अटकेतून उघडकीस आली आहे.
प्रयागराजमध्ये बनावट प्लेटलेटचा धंदा केला जात होता. या प्रकरणात पोलिसांनी दहा आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी डेंग्यूच्या रुग्णांना प्लेटलेट्स म्हणून मोसंबी ज्यूस दिल्याचे उघडकीस आले आहे.
स्थानिक पोलिसांनी या आरोपाची सत्यता पडताळण्यासाठी कसून चौकशीही सुरू केली आहे. अटक आरोपींपैकी काहींच्या मते, मोसंबी ज्यूस नव्हे तर ब्लड प्लाजमाचे प्लेटलेट्स म्हणून विक्री केली जात होती.
पोलिसांनी प्लेटलेटचे नमुने ताब्यात घेऊन त्यांच्या चौकशीसाठी न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. त्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपींवर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती प्रयागराजमधील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्लेटलेटच्या गोरख धंद्याने एका रुग्णाचा हकनाक बळी घेतला आहे. एका डेंग्यूच्या रुग्णाला प्लेटलेट्स म्हणून मोसंबी ज्यूस चढवण्यात आला होता. त्याचा दुष्परिणाम होऊन रुग्णाला काही वेळातच प्राण गमवावा लागला.
प्रदीप कुमार पांडे असे रुग्णाचे नाव असून त्याला डेंग्यूवरील उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाच्या मृत्यूने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित खाजगी रुग्णालयाला सील ठोकण्यात आले आहे.
प्लेटलेटचा गोरख धंदा सुरू असल्याच्या वृत्ताने आरोग्य प्रशासन प्रचंड हादरले आहे. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी सुरू केली आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक शैलेश कुमार पांडे यांनी या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
आरोपी प्लेटलेटचा बनावट स्टिकर लावून प्लेटलेट्स म्हणून विक्री करताना आढळून आले आहे.