पिंपरी चिंचवड / रणजित जाधव : मॉर्निंग वॉकला गेलेल्या 47 वर्षीय व्यक्तीला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. या घटनेत सदर व्यक्ती जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बळीराम बाबा गाढवे असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी बीआरटी रोड लगत ही घटना घडली आहे.
बळीराम गाढवे हे नेहमीप्रमाणे पहाटे मॉर्निंग वॉकला गेले होते. डायमंड जिमसमोरील बीआरटी रोडवरुन रस्त्याच्या कडेने जात असतानाच मागून आलेल्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की यात बळीराम हे हवेत उडून जमिनीवर आपटले. यात ते जखमी झाले. बळीराम यांच्या डोक्याला, डाव्या पायाला, हाताला, चेहऱ्याला मार लागला आहे.
या अपघाताची वाकड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अज्ञात कार चालकाविरोधात कलम 279, 338, 184, 119/177, 132 (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.डी.नाईक निंबाळकर अधिक तपास करत आहेत. दरम्यान, हा अपघात आहे की घातपात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पालघरमध्ये भरधाव कारच्या अपघातात तरुणाचा मृत्यू
भरधाव कारचे टायर फुटल्याने पालघरमधील बोईसर रोडवर अपघातात नवविवाहित तरुणचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर कार चालक गंभीर जखमी असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.