लखनऊ : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली व कश्मीरात हाय अॅलर्ट (High Alert) जारी करण्यात आला आहे. दहशतवादी संघटनांकडून देशातील स्वातंत्र्य दिन (Independence Day) सोहळ्याला टार्गेट करून दहशतवादी कारवाया घडवल्या जाऊ शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणेने याआधीच दिला आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेशात दहशतवादी हल्ल्या (Terrorist Attack)चा कट उधळून लावण्यात स्थानिक पोलिसांनी यश मिळवले आहे. इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या संशयित दहशतवाद्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. हे दहशतवादी स्वातंत्र्य दिन सोहळ्यादरम्यान हल्ला करण्याचा कट आखत होते. याचदरम्यान त्यांना अटक करून उत्तर प्रदेश पोलिसांनी घातपाताचा मोठा कट उधळून लावला आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) असदुद्दीन ओवेसीच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएमचा सदस्य सबाउद्दीन आझमी याला लखनऊ मुख्यालयात चौकशी केल्यानंतर अटक केली. कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजी) प्रशांत कुमार यांनी मंगळवारी या कारवाईची माहिती दिली. आझमीने त्याच्या चौकशीदरम्यान दिलावर खान आणि बैराम खान अशी आणखी दोघं संशयित दहशतवाद्यांची नावे घेतली आहेत, असे त्यांनी सांगितले.
आझमी हा आझमगढ जिल्ह्यातील अमिलो भागातील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो इसिस(ISIS) या दहशतवादी संघटनेमध्ये भरती करणाऱ्याच्या थेट संपर्कात होता, अशीही धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. एटीएसने आरोपी आझमीकडून बॉम्ब बनवण्यासाठी वापरलेली सामग्री, एक बेकायदा शस्त्र आणि काडतुसे जप्त केली आहेत.
इसिसच्या विचारधारेने प्रभावित झालेला आझमी हा जिहादी तत्वांचा प्रसार करत आहे तसेच तो इतर तरुणांना दहशतवादी संघटनेत सामील करण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी गोपनीय माहिती उत्तर प्रदेशच्या एटीएसला मिळाली होती. त्या गुप्त माहितीच्या आधारे चौकशीसाठी आझमीला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याचे इसिसशी संबंध असल्याचे पुरावे सापडले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. फेसबुकवर बिलाल नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधल्यानंतर आझमीने काश्मीरमध्ये होणाऱ्या कारवाईबद्दल संभाषण सुरू केले. बिलालने इसिसचा दुसरा सदस्य मुसा उर्फ खट्टाब काश्मिरी याच्याशी त्याचा संपर्क करून दिला. आझमीचा मुसा आणि त्यानंतर सीरियात राहणाऱ्या इसिसच्या अबू बकर अल-शमीशी संपर्क झाला, असेही पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे. (A plot to attack a terrorist attack on Independence Day celebrations in Uttar Pradesh has been foiled)