धुळे : धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात एका पोलीस निरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रविण कदम असं या पोलीस निरीक्षकाच नाव आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी हिरे महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे.
प्रवीण कदम हे गेल्या तीन वर्षांपासून धुळ्यात नियुक्त होते. त्यांनी प्रशिक्षण केंद्रातील शासकीय निवासात गळफास घेत जीवन संपवले. मृत्यूपूर्वी कदम यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरु नये, असं कदम यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.
घटनेची माहिती मिळताच धुले शहर पोलीस घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान पोलीस अधिकारी प्रवीण कदम यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेनंतर पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये खळबळ उडाली आहे. तपासाअंतीच कदम यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट होईल.
प्रवीण कदम हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील तळेगाव या गावचे रहिवासी आहेत. प्रवीण यांचे वडील भुसावळ येथे ऑडिओ मेकॅनिक म्हणून कार्यरत होते. दरम्यान वडिलांचे नोकरीनिमित्त पुणे येथे स्थलांतर झाल्यानंतर प्रवीण यांचे संपूर्ण शिक्षण पुणे येथे झालं.
1991 साली महाराष्ट्र पोलीसमध्ये हे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले. पोलीस विभागात सेवा करत असतानाच 2003 साली पोलीस विभागातील पीएसआय पदाची परीक्षा पास होऊन पीएसआय म्हणून त्यांची निवड करण्यात आली.
तीन वर्षांपूर्वी त्यांना पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाली होती. प्रवीण कदम यांचे संपूर्ण कुटुंब नाशिक येथे स्थायिक असून, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नाशिक शहरात सुप्रसिद्ध सर्पमित्र म्हणून ही त्यांची एक वेगळी ओळख होती.
पोलीस विभागात काम करणाऱ्या प्रवीण कदम यांना वाद्य वाजवण्याची प्रचंड आवड होती. मुलांच्या शिक्षणासाठीच प्रवीण यांचा परिवार नाशिक येथे स्थायिक झाला होता. तर प्रवीण स्वतः धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये गेल्या तीन वर्षापासून कार्यरत होते.
दरम्यान पोलीस निरीक्षक प्रवीण कदम यांनी आत्महत्या का केली त्याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र त्यांच्या आत्महत्यामुळे संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली असून, धुळे शहर पोलीस प्रवीण यांच्या आत्महत्या तपास करत आहेत.