नवी दिल्ली : प्रेयसीसोबत भांडण झाल्यानंतर प्रेयसीच्या मैत्रिणीच्या भावांनी मारहाण केल्याच्या रागातून एका रिक्षा चालकाने तरुणीचा बदला घेतला. रिक्षाचालकाने प्रेयसीच्या मैत्रिणीचे फेक इन्स्टाग्राम अकाऊंट बनवून तिचे फोटो पोस्ट केले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. रोशन शर्मा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शर्माला उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील लोनी येथून अटक करण्यात आली. ही बाब उघड झाल्यानंतर तरुणीला धक्काच बसला. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन शर्मा याचे त्याच्या प्रेयसीसोबत भांडण झाले होते. यामुळे प्रेयसीची मैत्रिण असलेल्या पीडित तरुणीने दोघांमध्ये हस्तक्षेप केला. पीडितेने आपल्या भावांना ही बाब सांगितल्यानंतर त्यांनी आरोपीला मारहाण केली. यामुळे आरोपी चांगलाच संतापला. या मारहाणीचा बदला घेण्यासाठी त्याने पीडित तरुणीला अद्दल घडवण्याचे ठरवले. यातून त्याने हे कृत्य केले.
पीडितेने गेल्या महिन्यात पोलिसांकडे कुणीतरी तिचे फेक अकाऊंट केल्याबाबत तक्रार दिली होती. या फेक अकाऊंटवरुन कुणीतरी तिच्या फोटोंशी छेडछाड करत अपलोड केले. तसेच तरुणीचा मोबाईल नंबरही टाकल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले होते. यानंतर पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास सुरु केला.
तपासादरम्यान पोलिसांना इन्स्टाग्रामवर तीन अकाऊंट आढळले. या अकाऊंटवरुन पीडितेचे अश्लील आणि विनयभंगाचे फोटो अपलोड करण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी सदर अकाऊंट ज्या आयपीवरुन ऑपरेट करण्यात येत होते त्याची माहिती काढली. या आयपी अॅड्रेसच्या आधारे पोलिसांनी आरोपीला गाझियाबादमधील लोनी येथून अटक केली.