नाशिक : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी असलेलं केंद्र असा टेंभा मिरवणाऱ्या आधारतीर्थ आश्रमातील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नुकताच एका चार वर्षीय बालकाचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आल्यानंतर बालकल्याण समितीच्या वतिने चौकशी केली जात आहे. त्यापैकी 35 मुलांची आत्तापर्यंत चौकशी करण्यात आली असून त्यामध्ये ज्या हेतूने हे आधारतीर्थ आश्रम सुरू आहे त्यालाच तिलांजली देण्यात आली आहे. 35 मुलांपैकी एकही मुलगा शेतकरी कुटुंबातील नसल्याची बाब समोर आली आहे. याबाबत अनेक मुलांना इतर आश्रम शाळेत ठेवण्यात आले आहे. अनेक मुलांमध्ये भीती निर्माण झाली असल्याने अनेक मुलं माहिती देत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बालकल्याण समितीची चौकशी संतगतीने सुरू आहे. समुपदेशन करून मुलांची माहिती गोळा करण्याची कसरत बालकल्याण समितीला करावी लागत असल्याची बाब समोर आली आहे.
अलोक शिंगारे या चार वर्षीय बालकाचा आधारतीर्थ आश्रमात गळा आळवून खून केल्याची बाब समोर आली होती, त्यानुसार त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
तांत्रिक बाबींची मदत घेत या खुनाच्या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना आधारतीर्थ आश्रमातील एका अल्पवयीन मुलाने हा खून केल्याची बाब समोर आली होती.
त्यानंतर या खुणाचे कारण समोर आल्याने पोलीसही चक्रावून गेले होते, यामध्ये अलोकच्या भावासोबत वाद झाल्याने तो शिवीगाळ करायचा म्हणून खून केल्याचं कारण समोर आले होते.
या संपूर्ण घटना चक्रावून टाकणाऱ्या असतांना आधारतीर्थ आश्रम हे परवानगी विना सुरू असल्याची बाब समोर आली आहे, बालकल्याण विभागाची त्याला परवानगी नसल्याचे समोर आले आहे.
संजय गायकवाड या व्यक्तीने हे आधारतीर्थ आश्रम सुरू केले असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींकरिता हे आश्रम असल्याची तो शेखी मिरवतो.
मात्र, सुरुवातीला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं दाखलही झाली होती, नंतर मात्र अनेक मुलं निघून गेली, त्यामुळे आसपासच्या खेड्यातील मुलांना घेऊन तो हे आश्रम चालवत असल्याचे समोर आले आहे.
इतकंच काय तर आत्तापर्यन्त 35 बालकांची चौकशी बाल कल्याण समितीने केली असून त्यात एकही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलगा-मुलगी आढळून आलेली नाही.
एकूणच आधारीतीर्थ आश्रम वादाच्या भोवऱ्यात सापडले असून येत्या काळात शासन आणि पोलीसांच्या कारवाईकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे, त्यात आता पुढील चौकशी कोणत्या दिशेला जाते हे बघणं देखील महत्वाचे आहे.