नवी दिल्ली : अतिघाई संकटात नेई, याचा प्रत्यय आपल्याला वारंवार येतो. मात्र तरीही वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळताना दिसत नाहीत. अशीच एक घटना गुरुग्राममध्ये उघडकीस आली आहे. यू टर्न घेताना बाईकस्वाराला एका भरधाव कारने जोरदार धडक (Car hit the bike) दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात उपरादरम्यान मृत्यू (Youth Death) झाला. ही सर्व थरारक घटना तेथील एका फर्निचरच्या दुकानाबाहेरील सीसीटीव्हीत कैद (Incident caught in CCTV) झाली आहे. संतोष राजपूत असे मयत बाईकस्वाराचे नाव आहे.
दिल्लीला लागूनच असलेल्या गुरुग्राम शहरात ही हिट अँड रनची थरारक घटना 28 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बाईकला धडक दिल्यानंतर कारचालक फरार झाला आहे.
कारची धडक इतकी जोरदार होती की, बाईकस्वार हवेत उडून जमिनीवर आपटला. तर बाईक कारखाली अडकली आणि कारचालकाने जवळपास 50 फूट ही बाईक फरफटत नेली.
घटनेनंतर तेथे उपस्थित नागरिकांनी जखमी बाईकस्वाराला तात्काळ नजीकच्या सोनादेवी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला सरकारी रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी मयत बाईकस्वार संतोष राजपूतच्या पत्नीच्या जबानीवरुन अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपी कारचालकाचा शोध घेत आहेत. मात्र घटनेला सहा दिवस उलटले तरी अद्याप आरोपीचा तपास लागला नाही.
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. मयत तरुण मूळचा बिहारचा रहिवासी आहे. कामानिमित्त तो गुरुग्राम येथे राहतो. कामावरुन रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घरी जात असतानाच ही भयानक घटना घडली.