नवी दिल्ली : दिल्लीतील एका सरकारी शाळेत संतापजनक घटना घडली आहे. शिक्षकाने एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या माराहाणीत विद्यार्थ्याचा हात मोडला आहे. या घटनेमुळे पाडित विद्यार्थ्याचे नातेवाईक संतप्त झाले आहेत. आरोपी शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्य शिक्षणाधिकाऱ्यांनी सदर शिक्षकाविरुद्ध चौकशी सुरू केली आहे. पाच दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. भूपेंद्र थपलियाल असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
एक भटका कुत्रा शाळेच्या आवारात घुसला. कुत्रा शाळेत घुसण्यासाठी पीडित विद्यार्थ्याला जबाबदार मानत शिक्षकाने विद्यार्थ्याला जबर मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थ्याचा हात मोडला आहे. विद्यार्थ्याच्या हाताला प्लास्टर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे 27 फेब्रुवारीपासून विद्यार्थ्याची परिक्षा आहे. यामुळे विद्यार्थी आता परीक्षा कसा देणार असा सवाल पालकांनी केला आहे.
जनपद पौडी येथील कल्जीखाल ब्लॉक अंतर्गत सरकारी शाळेत ही घटना घडली. याप्रकरणाची मुख्य शिक्षणाधिकारी यांनी दखल घेतली असून, पाच दिवसात चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आरोपी शिक्षकावर योग्य कारवाई केली जाईल, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.
शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाणीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. याप्रकरणी शिक्षण विभागाने कडक पावले उचलण्याची आवश्यकता आहे.