टिटवाळा : दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादात एका विद्यार्थ्याने शिवीगाळ (Abusing) केली. यानंतर तक्रार शिक्षकेकडे गेली. संतप्त झालेल्या शिक्षिकेने शिवी देणाऱ्या विद्यार्थ्याला काठीने मारहाण (Beating) करत त्याचा हात फ्रॅक्चर केल्याची घटना टिटवाळा येथील शंकुतला विद्यालयात घडली आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून टिटवाळा पोलिसांनी शिक्षिके (Teacher)विरोधात गुन्हा दाखल करत कारवाई सुरू केली आहे. प्रिया सिंग असं या शिक्षिकेचं नाव असून, शाळा प्रशासनाने देखील या प्रकरणी चौकशीअंती कारवाई करण्यात येईल अस स्पष्ट केलं आहे.
टिटवाळा परिसरातील शंकुतला विद्यालयात काल दुपारी शाळेत असताना एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला धक्का दिला. याचा जाब विचारण्यास गेलेल्या विद्यार्थ्याने शिवीगाळ केल्याची तक्रार शाळेतील शिक्षिका प्रिया सिंग यांच्याकडे केली. यानंतर शिक्षिका प्रिया सिंग यांनी वर्गात जाऊन दोन्ही विद्यार्थ्यांना बोलावत विचारणा केली. त्यानंतर संतापलेल्या शिक्षिकेने शिवी का दिली अशी विचारणा करत 15 वर्षीय विद्यार्थ्याला काठीने मारण्यास सुरुवात केली. या मारहाणीत काठीचा फटका विद्यार्थ्याच्या मनगटावर बसल्याने मनगटाचे हाड फ्रॅक्चर झाले.
विद्यार्थ्याने घरी जाऊन शिक्षकेकडून झालेल्या मारहाणीबाबत आपल्या आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर आई-वडिलांनी विद्यार्थ्यांना घेऊन टिटवाळा पोलीस स्थानकात मारहाण करणाऱ्या शिक्षिका प्रिया सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पालकांनी मारहाण करणाऱ्या शिक्षिकेविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आपला तपास सुरू केला आहे. याबाबत शंकुतला विद्यालय प्रशासनाने पालकांची तक्रार आली आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात येईल आणि चौकशी अंती कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. (A student was beaten up by the teacher for abusing him in Titwala, a case was registered in Titwala police)