अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून गळ्याला चाकू (Knife) लावत तिच्या गळ्यातली सोनसाखळी (Gold Chain) लुटून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात जबरी चोरी (Theft)चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र दिवसाढवळ्या घरात घुसून चोरीची घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अंबरनाथ पश्चिमेच्या फातिमा शाळेजवळ कॅनरा बँकेला लागून दिलीप निवास नावाची इमारत आहे. या इमारतीत पहिल्या मजल्यावर सौशम्मा वर्गीस आणि त्यांचे पती हे वृद्ध दाम्पत्य वास्तव्याला आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा अमेरिकेत वास्तव्याला आहे.
मंगळवारी सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान त्यांच्या घराबाहेर कुणीतरी उभं असल्याचं सौशम्मा यांना दिसलं. त्यामुळे दूधवाला आला असेल असं समजून त्यांनी दार उघडून पाहिलं असता तोंडाला स्कार्फ बांधलेला एक अनोळखी तरुण तिथे उभा होता.
हा तरुण सौशम्मा यांच्या घरात घुसला आणि त्यांना सोफ्यावर बसवत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी काढू लागला. सौशम्मा यांनी विरोध करताच या चोरट्याने कमरेला लावलेला चाकू काढून त्यांच्या गळ्याला लावला आणि जबरदस्तीने त्यांची सोनसाखळी हिसकावत पळून गेला.
यावेळी प्रतिकार करताना सौशम्मा यांच्या हाताला चाकू लागला. यानंतर चोरटा पळून गेला. या घटनेनंतर सौशम्मा वर्गीस यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या प्रमिला अलवारीस यांना फोन करून बोलावलं आणि त्यानंतर प्रमिला यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली आहे.
दरम्यान, आमच्या इमारतीत सगळे वृद्ध नागरिक एकटेच राहात असून आमच्या सुरक्षेची पोलिसांनी काळजी घ्यावी, असं आवाहन इमारतीतील रहिवासी प्रमिला अलवारीस यांनी केलंय.