पुणे : पोलिसांचे आणि चोरांचे नातं विळ्या भोपळ्याचं असतं..चोरांना पकडणे हे पोलिसांचे काम असले तरी काही चोर पोलीसांच्याही चार पावलं पुढं असतात. चोर आणि पोलीस असा पाठशिवणीचा खेळ सुरुच असतो. कधी पोलीस चोरांना मोठ्या कौशल्याने गुन्ह्याचा तपास करुन पुरावे गोळा करून बेड्या घालतात. तर कधी चोरांचा डाव यशस्वी होतो. चोर आणि पोलीस हा लपाछपीचा खेळ सुरूच असतो. असेच एक मासलेवाईक प्रकरण पुण्यात घडले आहे.
फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका सोन्याच्या व्यापाऱ्याकडे दागिने घडविण्यासाठी बंगालचे संजय जाना आणि सौरभ प्रसन्नजीत माईती हे कारागिर म्हणून कामाला होते. दागिने घडविण्यासाठी त्यांना दिलेल्या 381 ग्रॅम वजनाच्या सोन्यांसह ते पळून गेले. या प्रकरणात फरासखाना पोलीस ठाण्यात ६ मे रोजी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे पुणे पोलिसांचे एक पथक त्यांना पकडण्यासाठी पश्चिम बंगालला गेले होते. तेथून त्यांनी आरोपी संजय जाना याला पकडले आणि पुण्याला घेऊन येत होते. त्यासाठी हावडा दुरांतो एक्सप्रेस पकडली. या एक्सप्रेसच्या बी – 8 कोचमधून या चोराला घेऊन पुणे पोलीस येत होते.
आरोपी संजय तपनकुमार जाना ( रा. गोपीनाथ भीतरजाल प.बंगाल ) याला शुक्रवारी हावडा – पुणे दुरांतो एक्सप्रेसमधून आणत असताना नागपूर ते बुटीबोरी दरम्यान या आरोपीने आपल्याला बाथरुमला जायचे असे पोलीसांना सांगितले. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्याला बाथरूमजवळ पोलीसांनी नेले तेव्हा टॉयलेटच्या आत सोडून पोलीस बाहेर उभे राहीले. बराच वेळ वाट पाहूनही आरोपी काही केल्या टॉयलेटमधून बाहेर येईना. तेव्हा पोलीसांना संशय आला. त्यांनी टॉयलेटचा दरवाजा ठोठावला आतून काही प्रतिसाद येईना. त्यामुळे पोलीसांनी दरवाजा तोडला आणि आत पहातात तर काय चोर गायब झालेला. आरोपीने टॉयलेटच्या खिडकीच्या काचा फोडून तो पसार झाला होता. नागपूर रेल्वे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे पश्चिम बंगालच्या चोरांनी पुणे पोलीसांच्या हातात तुरी देऊन तो पसार झाला आहे. या प्रकरणाचा तपास आता सुरू आहे.