दिल्ली : दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात चोरट्याने घरफोड्या करुन अक्षरश: उच्छाद मांडला होता. अखेर दिल्लीच्या रघुवीर नगरातून राहणाऱ्या या सराईत चोराला पोलिसांनी अखेर त्याच्या एका चुकीमुळे जेरबंद करीत त्याची रवानगी तिहारमध्ये केली. हा सराईत चोर रात्रीच्या अंधारातही झाडूच्या काडीने देखील कोणतेही कुलुप आरामात उघडायचा अशी त्याची ख्याती होती. त्याच्या अटकेमुळे 12 घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यास पोलिसांना मदत होणार आहे.
दिल्लीतील रघुवीर नगरातील एका चाळवजा घरातून आरोपी संजय उर्फ डबल याला अटक करण्यात दिल्ली पोलीसांना अखेर यश आले आहे. त्याने दिल्लीच्या परिसरात अनेक घरफोड्या केल्या आहेत. त्याच्याकडे अगदी झाडूच्या काडीनेही लॉक उघडण्याची कला होती. त्याने चोरी केल्यानंतर एक चुक केली त्यामुळे पोलीस त्याच्या पर्यंत पोहचले आणि त्याला जेरबंद करण्यात अखेर यश आले. आरोपी संजय ऊर्फ डबल याच्याकडून 85 रुपयांची रोख रक्कम, चांदीची दागिने, किंमती घड्याळे असा ऐवज जप्त केला गेला आहे. त्याच्या अटकेमुळे 12 घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यास पोलिसांना मदत होणार आहे.
डीसीपी द्वारका एम. हर्षवर्धन यांनी सांगितले की, एसीपी राम अवतार यांच्या नेतृत्वाखाली इन्स्पेक्टर विवेक मेंदोला, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक विनोद, हेड कॉन्स्टेबल राहुल आणि प्रवीण यांच्या टीमने सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपी संजय याला अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फूटेज तपासायला घेतले होते. सीसीटीव्हीची लिंक जुळवून त्याचा मागोवा घेताना त्याने केलेली एक चुक त्याला महाग पडली.
चोरट्याने गुन्हा केल्यानंतर एका फाईव्ह स्टार हॉटेल ताज पॅलेसच्या एका स्टाफला घेऊन जाणाऱ्या क्रुझर गाडीला हात दाखवून लिफ्ट मागितली. त्यामुळे त्याला जेलमध्ये पोहचावे लागले. पोलीसांनी हॉटेल परीसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि ड्रायव्हरकडून मिळालेल्या माहीती आधारे चोराला रघुवीर नगरातील त्याच्या घरातून पकडले. त्याच्याकडे चोरीची एक लेडीज पर्सही सापडली.
पोलीसांनी केलेल्या चौकशीत संजय ऊर्फ डबल याने चोरी केल्यानंतर लॅपटॉप आणि मोबाईल त्याने गोंविद नावाच्या व्यक्तीला दिला. भोला याने त्याच्याकडून सोने आणि चांदीचे दागिने विकत घेऊन ते सुल्तानपुरी येथील सुरेश ऊर्फ मोटा नावाच्या व्यक्तीला एका लाखात विकले. आता पोलीस सुरेश ऊर्फ मोटाचा शोध घेत आहे. संजय याच्यावर पूर्वीचे हरीनगर, बुरारी, द्वारका सेक्टर -23, निहाल विहार, रान्होला, ख्याला, बाबादास नगर आणि छावला ठाणा परिसरातील 12 गुन्ह्यांची उकल झाली आहे.