मुंबई : रिक्षा चालकांची अरेरावी आणि दादागीराचा त्रास प्रवाशांना नेहमीच होत असतो. प्रवाशी याबाबत वारंवार तक्रारी देखील करत असतात. अशाच एका बेजबाबदार आणि अतिउत्साही रिक्षावाल्याल्यावर थेट रेल्वे पोलिसांनी कारवाई केली आहे. या रिक्षावाल्याने थेट कुर्ला रेल्वे स्टेशनच्या(Kurla railway station) प्लॅटफॉर्मवरच रिक्षा आणली होती. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या रिक्षावाल्यावर कारवाई करत त्याला कोर्टात नेले.
कुर्ला रेल्वे स्थानक हे मुंबईतील एक गजबजलेले रेल्वे स्थानक आहे. येथे प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी आणि वदर्ळ असते. अशातच एका रिक्षाचलाकाने प्रवाशांची घाबरगुंडी उडवणारे कृत्य केले आहे.
एका रेल्वे प्रवाशाने या रिक्षा चालकाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओत कुर्ला स्थानकातील एक नंबर प्लॅटफॉर्मवर एक रिक्षा आल्याचे दिसत आहे. रिक्षाला पाहून स्टेशनवर उभे असलेले प्रवाशी रिक्षाजवळ जातात.
यानंतर हा रिक्षा चालक रिक्षा वळवतो आणि तो स्टेशनच्या बाहेर पडत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. रिक्षा वळवण्यासाठीच रिक्षा प्लॅटफॉर्मवर आणल्याचे या रिक्षाचालकाचे म्हणणे होते.
ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ शेअर केला त्याने रेल्वे प्रशासनालाही टॅग केले होते. व्हिडिओ पाहिल्यानंतर तात्काळ या रिक्षा चालकावर कारवाई करण्यात आली आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याला कुर्ला येथील आरपीएफ चौकीत आणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याची रिक्षा देखील जप्त करण्यात आली.
रिक्षा चालकाला सीएसएमटी येथील रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला दंडासह शिक्षा देखील करण्यात आल्याचे समजते.
Kurla station auto mafia on the platform. Please check & verify this. Too much freedom given by Kurla @MTPHereToHelp & @RPFCRBB Coincidentally on the first day of new @drmmumbaicr Isn't this a safety hazard for trains? @SrdsoM @RailMinIndia @RPF_INDIA pic.twitter.com/dXGd95jkHL
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) October 15, 2022