पुणे / विनय जगताप (प्रतिनिधी) : पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूरच्या हद्दीत, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी गोळीबार करत 3 लाख 78 हजारांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. सोनल वाईन्स या मद्यविक्री दुकानीतील रोकड, रात्री दुकानं बंद केल्यानंतर घरी घेऊन जात असताना ही घटना घडली आहे. या प्रकरणी 3 अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड शिवापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिक तपास करत आहेत. कालेश्वर आगरिया आणि दिपक जगदाळे अशी लुटण्यात आलेल्या दुकानमालकांची नावे आहेत.
खेड शिवापूरजवळ सोनल वाईन्स हे मद्यविक्रीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे काल रात्री कालेश्वर आगरिया आणि दिपक जगदाळे हे दोघे दुकान बंद करुन घरी चालले होते. त्यांच्याकडे दुकानातील दिवसभर जमा झालेली 3 लाख 78 हजारांची रक्कम होती. दोघेजण घरी जात असतानाच अचानक पाठीमागून दुचाकीवरून तिघे जण आले.
दुचाकीवरुन आलेल्या या तिघा जणांनी पैसे असणारी बॅग पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र कालेश्वर यांनी विरोध केला. यामुळे चोरट्यांनी आपल्या जवळील पिस्तुल काढले आणि दोन गोळ्या फायर करत दहशत निर्माण केली. यानंतर मालकाच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून पळ काढला.
या प्रकरणी पीडित मालकांनी खेडशिवापूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत फिर्याद दिली. पीडितांच्या फिर्यादीनुसार खेड-शिवापूर पोलिसांनी अज्ञात तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे आणि कर्मचारी करत आहेत.