इंदूर : इंदूरमध्ये एक धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. इंदूरमध्ये एका इंटिरियर डिझायनर महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे महिला जेव्हा आत्महत्या करत होती, तेव्हा तिचा पती छत्तीसगडमध्ये मोबाईलवर पत्नीला आत्महत्या करताना लाईव्ह पाहत होता. त्याने तात्काळ आपल्या ओळखीच्या लोकांना याबाबत सांगितले आणि आपल्या घरी जाण्यास सांगितले. मृत्यूपूर्वी महिलेने एक 10 पानी सुसाईड नोट लिहिली आहे. यात तिने अनेक हायप्रोफाईल लोकांवर आरोप केले आहेत.
करुणा शर्मा असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. ती पेशाने इंटिरियर डिझायनर होती. इंदूरच्या लासुदिया पोलीस स्टेशन हद्दीतील स्कीम क्रमांक 114 मध्ये ती राहत होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
करुणा हायप्रोफाईल सोसायटीतील महिला होती. भिशी फंडातील आर्थिक व्यवहारातूनच ही घटना घडल्याचा अंदाज आहे. करुणा एका भीशी फंड चालवणाऱ्या ग्रुपशी संबंधित होती. ही भिशी करोडो रुपयांची होती. भिशीचे पैसे देण्यासाठी करुणावर दबाव होता.
ज्यांचे पैसे या भिशीत अडकले होते ते पैसे परत मिळवण्यासाठी करुणावर दबाव टाकत होते. मात्र लोकांचे पैसे परत करण्यास ती असमर्थ होती.
दोन महिन्यांपूर्वी भिशीच्या पैशासाठी काही लोकांना तिला घरी येऊन धमकावलेही होते. त्यावेळी करुणाने पोलिसात तक्रारही दिली होती. यानंतर करुणा शहर सोडून गेली. मंगळवारी संध्याकाळीच ती इंदूरला पोहचली आणि तिने आत्महत्या केली.
करुणाचा पती पेशाने अभियंता असून, तो छत्तीसगडमधील भिलाई येथे राहत होता. करुणाला सात वर्षांची मुलगी असून, ती ही पतीसोबत राहत होती. मंगळवारी रात्री पतीने करुणाला फोन केला. मात्र करुणाने फोन उचलला नाही, म्हणून पतीने मोबाईलवरील सीसीटीव्ही अॅप चालू केले.
सीसीटीव्ही पाहताच पतीला धक्का बसला. करुणा तिच्या खोलीत आत्महत्या करत होती. पतीने तात्काळ घराजवळ राहणाऱ्या ओळखीच्या व्यक्तीला याची माहिती दिली. लोक घरी पोहचून दरवाजा तोडून आत शिरेपर्यंत करुणाचा मृत्यू झाला होता.
यानंतर लासुडया पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. घटनास्थळावरून पोलिसांना दहा पानी सुसाईड नोट सापडली आहे.