डोंबिवली : टीसीने तिकिट मागितले म्हणून महिलेने शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत दोन भावांसह पोलीस ठाण्यात धिंगाणा घातल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. सदर महिला रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास करत होती. याप्रकरणी डोंबिवली जीआरपी पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणाऱ्या महिलेसह तिच्या दोन भावांविरोधात डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नितीन पांडे आणि सर्वेश पांडे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
टिटवाळा येथे राहणारी शशी पांडे ही महिला काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आसनगाव लोकलने टिटवाळा येथे जात होती. डोंबिवली जवळ एका महिला टीसीने तिच्याकडे तिकिट मागितले. मात्र तिकिट नसल्याने महिला टीसीने दंडाची पावती शशीला दिली. त्यामुळे शशी संतापली.
शशीने महिला टीसीशी हुज्जत घालण्यास सुरुवात करत धक्काबुक्की केली. डोंबिवली रेल्वे स्टेशनला उतरल्यावर संबंधित महिला टीसीने घडल्या प्रकाराबाबत डोंबिवली रेल्वे पोलिसात तक्रार नोंदवली. या दरम्यान शशी हिने आपल्या दोन्ही भावांना बोलवून घेतले.
यानंतर बहिण भावांनी मिळून डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यातही एकच गोंधळ घातला. याशिवाय पांडे बंधूंनी पोलीस कर्मचाऱ्यांना देखील धक्काबुक्की केली.
याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात नितीन पांडे आणि सर्वेश पांडे या दोन्ही भावांविरोधात गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली. सेकंड क्लासचा पास असताना फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.