कल्याण : गुन्हेगारीमध्ये कल्याण-डोंबिवली नाव नेहमीच चर्चेत असते. रोज काही ना काही गुन्हे कल्याणमध्ये उघडकीस येत असतात. स्टेशन परिसरात केडीएमसीच्या बसमध्ये एका महिलेला लुटल्याची घटना आज उघडकीस आली आहे. कल्याण स्थानक परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. गर्दीचा फायदा प्रवाशांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत. अशीच घटना एका सेवानिवृत्त महिलेसोबत घडली आहे. बसमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिला प्रवाशाची पर्स लंपास केली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या चोरट्याचा शोध घेत आहेत.
कल्याण स्टेशन परिसरात काही कामानिमित्त मिथिलेश दीपक बारगल ही महिला आली होती. काम आटोपून आंबिवलीला आपल्या घरी जाण्यासाठी तिने कल्याण स्थानकातून बस पकडली. बसमध्ये गर्दी असल्याने त्यांनी दागिने आणि रोकड असलेली पर्स काखेत अडकवून ठेवली होती. यावेळी एक चोरटा बसमध्ये घुसला. त्याने महिलेला काही कळायच्या आत तिच्या काखेतील पर्स खेचून पसार झाला. पर्समध्ये 29 हजार 700 रुपयांची रोकड होती. तिकिट काढण्यासाठी महिला पैसे काढण्यासाठी गेली असता आपली पर्स चोरीला गेल्याचे महिलेच्या लक्षात आले.
महिलेने थेट महात्मा फुले पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद करत चोरट्याचा तपास सुरु केला आहे. दरम्यान, या लुटीच्या घटनांना आळा घालण्यासानी पोलिसांनी ठोस कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.