सोलापूर : रागाच्या भरात कोण काय करेल याचा काही नेम नाही. असाच एक धक्कादायक प्रकार सोलापुरात( Solapur) घडला आहे. केसाला डाय करूही केस पांढरे राहिल्याने एक महिला चांगलीच भडकली. रागाच्या भरात या महिलेने ब्युटी पार्लर मध्ये गोंधळ घातला. ब्युटी पार्लर चालकाला मारहाण करत या महिलेने पार्लरची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. या महिले विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूरमधील सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या डायमंड या ब्युटी पार्लरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. वर्षा काळे असे धिंगाणा घालणाऱ्या महिलेचे नाव आहे. तर ब्युटी पार्लर चालक मोहम्मद काझीम याने या महिले विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
वर्षा काळे या महिलेने काही दिवसांपूर्वी या पार्लरमधून केसांना डाय लावले होते. तुम्ही केलेले हेअर डाय निघून गेले आहे. माझे केस काळे होण्याऐवजी पांढरेच दिसत आहेत. मला पुन्हा एकदा डाय करून द्या, अशी मागणी महिलेने केली. या वरुन मोहम्मद काझीम आणि या महिलेमध्ये वाद झाला.
रागाच्या भरात या महिलेने ब्युटी पार्लर चालक मोहम्मद काझीम या चप्पलने मारहाण केलीय. एवढ्यावरच न थांबता या महिलेने पार्लरमधील आरशांच्या काचांचीही तोडफोड केली.
वर्षा काळे या तोडफोड करणाऱ्या महिलेचे विरोधात मोहम्मद काझीम सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. दरम्यान तक्रारीची दखल घेत सदर बाजार पोलिसांनी भा.द.वि. 324, 323, 504, 506 कलमांतर्गत महिले विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.