पुणे : पुण्यात एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. पती वेळ देत नव्हता म्हणून पत्नीने जे केले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. घटना उघड होताच पोलीसही चक्रावून गेले. पती वेळ देत नव्हता म्हणून पत्नीने चक्क पतीच्या मेलवरुन आयटी कंपनीला बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली. याप्रकरणी सदर महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेविरोधात कलम 506 (2) आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमानुसार चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला शिक्षिका आहे. पतीला धडा शिकवण्यासाठी तिने नामी शक्कल लढवली आणि थेट तुरुंगात गेली. पोलीस अधिक तपास करत आहेत.
महिला कोंढवा परिसरात एका कोचिंग क्लासमध्ये इंग्रजी विषयाची शिक्षिका म्हणून काम करते, तर पती आयटी कंपनीत नोकरीला आहे. पती सतत कामात व्यस्त असतो. पत्नीला वेळ द्यायचा नाही. यामुळे पत्नी वैतागली होती. त्यामुळे तिने पतीला अद्दल शिकवण्यासाठी शक्कल लढवली. तिने पतीच्या ईमेलवरुन कंपनीला बॉम्ब ठेवल्याचा मेल पाठवला. विशेष म्हणजे ती कंपनी पतीने सोडली आहे.
धमकीचा मेल आल्याने कंपनीत एकच खळबळ उडाली. चंदननगर पोलिसांना धमकीची माहिती देण्यात आली. पोलिसांनी ईमेलचा आयपी अॅड्रेस शोधून काढला. तो पतीच्या टॅबलेटचा होता. तसेच ईमेलमध्ये पतीचा फोन नंबरही होता. त्यावरुन पोलिसांनी पती-पत्नीची ताब्यात घेत चौकशी केली. चौकशी दरम्यान पत्नीने आपण धमकीचा मेल पाठवल्याची कबुली दिली. यानंतर चंदननगर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.