अहमदनगर : भांडण सोडवायला गेलेल्या महिलेची मेव्हण्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर अन्य चौघे जण पळून जाण्यास यशस्वी झाले आहेत. याप्रकरणी शहादेव रामकिसन धायतडक, शुभम शहादेव धायतडक, रणजीत आजिनाथ धायतडक, अक्षय सखाराम धायतडक, संदीप बाळासाहेब शिरसाट, सोमनाथ गणपत घुले यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी शहादेव धायतडक आणि शुभम धायतडक यांना पोलिसांनी अटक केली आहे. सुशाला राजेंद्र किर्तने असे मयत महिलेचे नाव आहे.
सुशाला किर्तने यांचा भाऊ बाळासाहेब शिरसाट याचा सोमवारी बडे वाडी येथे दहाव्याच्या कार्यक्रमात शहादेव धायतडक याच्यासोबत वाद झाला होता. शहादेव धायतडक हा सुशाला यांचा मेव्हणा आहे. दोघा मेव्हण्यांची भांडणे झाल्यानंतर बाळासाहेब हा सुशाला यांच्याकडे किर्तनवाडीला आला होता. सुशाला यांच्या मुलाचे रविवारी लग्न झाले होते. लग्नानंतरच रीतीरिवाज असल्याने बाळासाहेब हे बहिणीकडे आले होते.
बाळासाहेब यांच्या मागे त्यांचा मेव्हणा शहादेव धायतडक, त्याचा मुलगा शुभम धायतडक आणि अन्य चौघेजण हत्यारं घेऊन आले. यावेळी राजेंद्र किर्तने आणि सुशाला किर्तने यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुशाला यांच्या डोक्यात शुभमने लाडकी दांडक्याने मारहाण केली. यात सुशाला या जखमी होऊन जमिनीवर कोसळल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.