सांगली : मुलं पळवणारी टोळी (Child Kidnapping Gang) समजून साधूंना मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, आज पुन्हा मुले पळवणारी चोर समजून एका महिलेला झाडाला बांधून मारहाण (Beaten to Women) केल्याची घटना सांगलीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी जत पोलिसांनी चार महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे अशा अफवेतून मारहाणीची (Beating by Rumours) ही दुसरी घटना आहे. याआधी जत तालुक्यात साधूंना अशाच प्रकारे मारहाण करण्यात आली होती.
सांगलीतील जत तालुक्यात मुले पळवणारी महिला चोर समजून महिला ग्रामस्थांनी झाडाला बांधून भंगार गोळा करणाऱ्या महिलेला मारहाण केली. जत तालुक्यात मुले चोरणारी टोळी आल्याचा मॅसेज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याच गैरसमजुतीतून हा प्रकार घडला आहे.
जतच्या ताड वस्ती जुने गोडावून येथे महिला लहान मुलांना घेऊन जात असताना मिळून आल्याने तिला पकडून ठेवले आणि झाडाला बांधण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि महिला जमा झाल्या होत्या. या महिलेला चार महिलांनी मारहाण केली.
घटनेची माहिती मिळताच जत पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सदर महिलेला ताब्यात घेतले. ही महिला जतच्या शेगाव येथील रहिवासी आहे आणि भंगार गोळा करण्यासाठी आली होती. महिलेला तिच्या गावी पाठवण्यात आले आहे. तर मारहाण केलेल्या चार महिलांच्या विरोधात जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वी मुले चोरणारी टोळी समजून जत तालुक्यातील लवंगा येथे चार साधूंना मारहाण करण्यात आली होती. जतमधील ही दुसरी घटना आहे. पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर विश्वास ठेवू नये, असे आव्हान केले आहे.