कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक महिला तीन वर्षापासून बेपत्ता होती. महिलेच्या वडिलांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. तीन वर्षे वडील मुलीसाठी पोलीस ठाण्याच्या खेटा घालत होते. तीन वर्षांनी अखेर मुलीचा शोध लागला. पण जे दृश्य समोर आलं ते पाहून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. तीन वर्षापूर्वीच पतीने महिलेची हत्या केली होती. हत्या करुन मृतदेह सेप्टीक टँकमध्ये टाकला होता. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगना जिल्ह्यात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली होती. मात्र ठो, पुराव्याअभावी त्याला जामिन मिळाला. सीबीआय याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
भोंबल मंडल आणि त्याची पत्नी टुम्पी मंडल सोनारपूरमध्ये वास्तव्यास होते. मार्च 2020 मध्ये टुम्पा अचानक गायब झाली. शोधाशोध करुनही ती सापडत नव्हती. अखेर तिच्या वडिलांनी सोनारपूर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलीसही महिलेचा शोध घेत होते. मात्र तरीही तिचा शोध लागत नव्हता. महिलेच्या पतीलाही ताब्यात घेण्यात आले होते. सतत पतीची चौकशी सुरु होती. मात्र तो ही काहीच माहिती देत नव्हता. अखेर कोर्टाने सीबीआयकडे तपास सोपवला.
सीबीआयने भोंबलची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत आपणच पत्नीची हत्या केल्याचे सांगितले. हत्या करुन मृतदेह घरातील सेप्टीक टँकमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. यानंतर पतीला अटक करण्यात आली होती. मात्र ठोस पुराव्यांअभावी त्याची जामिनावर सुटका झाली. पोलीस भोंबलच्या घरातील सेप्टीक टँकमधून मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, भोंबलने पत्नीची हत्या का केली याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.