बदलापूर : बदलापुरात किरकोळ वाद (Minor Dispute) एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने केलेल्या मारहाणीत (Beating) दुसऱ्या तरुणाला वर्मी फटका बसल्यानं त्याचा मृत्यू (Death) झाला. दुर्दैवी बाब म्हणजे मोठ्या भावाच्या वाढदिवशीच लहान भावाचा मृत्यू झाला. शुभम मोरे असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूरच्या पोद्दार कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या शिवम मोरे या तरुणाचा 15 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. त्यामुळं रात्री मित्रांसोबत पार्टी करून तो कात्रप परिसरात त्याच्या मित्राला सोडण्यासाठी जात होता. यावेळी शिवमचा त्याचा मित्र पुष्कर धुळे याच्याशी जोरदार वाद झाला.
यामुळं शिवमने त्याचा लहान भाऊ शुभमला तिथे बोलावून घेतलं. शुभम तेथे आल्यानंतर त्याच्याच आणि पुष्करमध्ये वाद होऊन त्याचे हाणामारीत रुपांतर झाले. यात पुष्कर धुळे याने शुभम याच्या छातीत जोरात कोपर मारलं. मात्र हा फटका वर्मी बसल्यानं शुभम तिथेच खाली कोसळला.
शुभमला तात्काळ रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पुष्कर धुळे याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्याला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.