गोविंद ठाकुर : मुंबईतील कांदिवली (Mumbai Kandivali) पश्चिम गणेश नगर (ganesh nagar) येथे सकाळी एका तरुणावर अचानक गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोहोचलेले कांदिवली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस सध्या गोळीबाराची माहिती देत नाहीत. मात्र एक सीसीटीव्ही (CCTV)फुटेज समोर आले असून त्यात गोळीबार झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्याचबरोबर या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मनोज लालचंद चौहान असे मृताचे नाव असून, त्याचे वय अंदाजे ३० वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. तो इमिटेशन ज्वेलरीचे काम करतो. सध्या कांदिवली पोलिसांनी मृतदेह शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घटनास्थळी दाखल झालेले मुंबई पोलिसांचे अनेक वरिष्ठ अधिकारी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत अशी माहिती स्थानिक, माजी नगरसेवक, कमलेश यादव यांनी दिली.
स्थानिक माजी नगरसेवक कमलेश यादव म्हणाले की, गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हे पोलिसांचे अपयश आहे. यापूर्वीही या भागात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.
डीसीपी अजय कुमार बन्सल यांनी सांगितले की, सकाळी 7.45 वाजता मनोज चौहान नावाच्या 32 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद खून झाला आहे. प्राथमिक तपासात फायरिंग झाल्याचे दिसते, पोलिस सर्व प्रकारे तपास करत आहेत. मृतक हा लालजी पाडा येथे जवळपास राहतो. इमिटेशन ज्वेलरीमध्ये काम करतो. त्याच्यावर कोणताही गुन्हा नोंद नाही, आम्ही या हत्येमागील कारण तपासत असून खून कोणी केला याचा तपास करत आहोत.