जयपूर : राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. क्षुल्लक वादातून एका 22 वर्षीय तरुणाची हत्या केल्याने अजमेर शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. तरुणा मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाईकांनी आरोपीचा लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. रोहित असे मयत तरुणाचे नाव आहे. पेट्रोल पंपावर झालेल्या क्षुल्लक वादातून ही घटना घडली. आरोपी पेट्रोल पंपाचा मालक आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. फरार आरोपीचाही शोध घेत आहेत.
पीडित तरुण रात्री उशिरा पेट्रोल पंपावर बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. तेथेट त्याचे दोन मित्र भास्कर वैष्णव आणि तरुण हाडा हे कर्मचारी आहेत. रोहित त्यांच्यासोबत उधारीबाबत बोलत होता. इतक्यात पेट्रोल पंपाचा मालक रास बिहारी आला आणि रोहितला शिवीगाळ करु लागला. तो दारुच्या नशेत होता. रासबिहारी भांडण करु लागला. म्हणून रोहितने वडिलांना फोन करुन बोलावले.
रोहितच्या वडिलांसोबतही रास बिहारी वादावादी करत जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. यानंतर पिता-पुत्राने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानंतर दोघे घरी येऊन झोपी गेले. यानंतर रात्री 12 वाजता बिहारी रोहितच्या घरी आला आणि त्याला आवाज देऊ लागला. रोहित दरवाजा उघडून बाहेर येताच त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला जाळले.
रोहितचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीय बाहेर आले. घरच्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, आरोपीला लवकर अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.