उन्नाव : उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये अंधश्रद्धेतून (Superstition) एका तरुण साधू (Sadhu)ने त्याच्या जीवावर बेतणारा प्रकार केला. मोक्ष (Moksha) मिळवण्यासाठी 22 वर्षांच्या साधूने मंदिरातील चार पुजाऱ्यांच्या मदतीने स्वतःला जमिनीत गाडून घेतले होते. हा प्रकार वेळीच निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जिवंत समाधी घेऊ पाहणाऱ्या साधूला जमिनीतून बाहेर काढले. त्यामुळे त्या साधूचे प्राण वाचले. मंदिराच्या परिसरात हा प्रकार केल्याचे उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
साधू वेशधारी तरुणाने मोक्ष मिळवण्याचा निर्धार केला. यासाठी त्याने समाधी घेण्याचे ठरवले व मंदिरातील चार पुजारींची मदत मिळवली. साधूसाठी मंदिराच्या परिसरातच खोल खड्डा खोदण्यात आला होता. त्यात साधू गेल्यानंतर वरुन माती टाकून खड्डा बुजविण्यात आला होता.
वास्तविक हा प्रकार साधूच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चारही पुजारींविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. साधू वेशधारी तरुण खड्ड्यामध्ये जवळपास सात मिनिटे दफन राहिल्याचे उघडकीस आले आहे.
आशिवान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताजपूर गावात ही घटना घडली आहे. या घटनेने ग्रामीण भागातील अंधश्रद्धेतून व अनिष्ट प्रथेतून अजूनही जीवघेणे प्रकार घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बांगरमाऊचे सीओ पंकज कुमार सिंह यांनी या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
ताजपूर गावातील लोकांनी घटनेबाबत पोलिसांकडे जबाब नोंदवले आहेत. 22 वर्षीय साधू वेशधारी तरुण शुभम हा संध्याकाळी मंदिराजवळ समाधी घेण्याच्या तयारीत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना कळवले.
त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे शुभमने समाधी घेतल्याचे पोलिसांना आढळले. मंदिरातील चार पुजारी साधू शुभमचे दफन करून मातीवर लाल ध्वज फडकवत होते. पोलिसांनी अजिबात वेळ न दवडता शुभमला खड्ड्यातून बाहेर काढले.
सुदैवाने तो जिवंत होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. केवळ मोक्ष मिळेल या अंध भावनेतून त्याने हा प्रकार केल्याचे निदर्शनास येताच पोलिसही चक्रावून गेले आहेत.