डोंबिवली / 28 ऑगस्ट 2023 : डोंबिवलीत चोऱ्यांचं सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. वाढत्या चोऱ्या रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यातच हल्ली प्रेयसीला खूश करण्यासाठी किंवा झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने चोऱ्यांचे सत्र खूपच वाढले आहे. अशीच एक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी एका तरुणाने रिक्षा चोरीचा मार्ग निवडला. मग हाच मार्ग त्याला तुरुंगापर्यंत घेऊन गेला. डोंबिवली टिळकनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अंबरनाथमधून अटक केली आहे. देवल उर्फ गणेश महादू गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. टिळकनगर, कोळसेवाडी, शिवाजीनगर अंबरनाथ आणि मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार रिक्षा चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली.
टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीत एका रिक्षा चालकाची रिक्षा चोरीला गेली होती. रिक्षा चोरीची तक्रार मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांनी तातडीने विशेष तपास पथक स्थापन केले. रिक्षा चोरी गेलेल्या भागातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. फुटेजमध्ये एक जण रिक्षा चोरुन नेत असल्याचे आढळले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे त्याची ओळख पटवली. त्याची माहिती घेतली असता सदर व्यक्ती अंबरनाथमधील रहिवासी असल्याचे पोलिसांना समजले.
पोलिसांनी अंबरनाथ परिसरात शोध घेऊन तांत्रिक माहितीच्या आधारे देवल उर्फ गणेश महादु गायकवाड याला शंकर मंदिराच्या बाजूला असलेल्या भेंडीपाडा चाळ भागातून अटक केली. देवलने टिळकनगर, कोळसेवाडी, शिवाजीनगर अंबरनाथ, मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतून चार रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. झटपट श्रीमंत होण्यासाठी हा रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या रिक्षांचे झटक्याने हँडल तोडायचा आणि वायरीच्या साह्याने रिक्षा स्टार्ट करून रिक्षा चोरी करायचा. चोरी केलेल्या रिक्षांचे नंतर पाठ काढून विकायचा. आरोपीने हे पार्ट कुठे विकले? चार रिक्षांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत का? याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.