बुलढाणा : अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या तरुणा (Youth)चा तेथील तलावात बुडून मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना 13 जुलै रोजी साखरखेर्डा येथे घडली आहे. गणेश बाबुराव दानवे असे मयत तरुणाचे नाव आहे. साखरखेर्डा गावातीलच एका वृध्द महिलेच्या अंत्यसंस्कारसाठी या तलावाजवळील स्मशानभूमीत गणेश गेला होता. मात्र अंत्यसंस्कार झाल्यावर त्याला या तलावात अंघोळ करण्याचा मोह आवरला नाही आणि पोहण्यासाठी तो तलावात उतरला. मात्र तलावातील खोल पाण्यात बुडून (Drowned) त्याचा मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील मृत गणेश दानवे हा युवक गावाच्या बाहेर असलेल्या रतन तलावाशेजारी अंत्यसंस्कारासाठी गेला होता. मात्र स्मशानभूमी शेजारी असलेल्या तलावात अंघोळ करायला गेला असता तो पाण्यात बुडला. यावेळी काही युवकांनी त्याला विरोधही केला. परंतु कुणाचेही न ऐकता सरळ तो तलावात काही अंतरावर चालत गेला. आपण सहज पुढच्या काठावर जाऊ शकतो, असा भ्रम त्याला झाला असावा आणि तलावाच्या मधोमध जात नाही तोच गणेश पाण्यात बुडाला. तलावाची पातळी खोलवर असल्याने शोध घेऊनही तो सापडला नाही. गेल्या तीन दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे घटनेच्या दिवशी गणेशचा मृतदेह तलावात सापडला नव्हता. पावसामुळे शोध कार्यात अडथळा येत होता. परंतु काल एनडीआरएफच्या टीमने शोध मोहिम राबवली आणि तलावत असलेल्या युवकाचा मृतदेह त्यांना सापडला. (A youth drowned in lake while swimming in Buldhana)