नांदेड : शिक्षक अनिल चव्हाण हे मुखेड तालुक्यातील सोनपेठवाडी या गावचे मूळ रहिवासी होते. वस्ती शाळेवर काही वर्ष काम केल्यानंतर गारगव्हाण येथे २०१४ साली जिल्हा परिषद शाळेवर त्यांची नियुक्ती झाली होती. तेव्हापासून ते याच शाळेवर कार्यरत होते. हादगाव येथे तालुक्याच्या ठिकाणी ते एका भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते. सहशिक्षिका मला ब्लॅकमेल करते. असं सांगून तो कालच्या रात्री शाळेत गेला. पण, दुसऱ्या दिवशी घरी परतलाच नाही.
बुधवारी निकालाचे काम असल्याचे सांगून अनिल चव्हाण हे गारगव्हाण येथे शाळेत आले. रात्री शाळेतच ते मुक्कामी थांबले. आज २० एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता शाळेतील सेवकाने साफसफाईसाठी शाळेचे दार उघडले. तेव्हा शिक्षक चव्हाण यांनी गळफास घेतल्याचे संबंधित सेवकाच्या निदर्शनास आले.
अनेक वेळा या अनिल चव्हाण यांच्याकडून सहशिक्षिकेने उसणे म्हणून पैसे मागून घेतले होते. एकूण तीन लाख ४० हजार रुपये या शिक्षिकेकडे येणे बाकी होते. असा उल्लेख शिक्षकाने आपल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे. मात्र काही दिवसांनंतर आरोपी सहशिक्षिका ही अनिल चव्हाण यांना विविध कारणावरून ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करू लागली. अनिल चव्हाण हे या प्रकारामुळे सतत चिंतेत असायचे.
ही बातमी गारगव्हाण गावासह तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थांनी ही बाब मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. शेकडे यांना दूरध्वनी ही बातमी कळवली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शेकडे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह हादगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.
मृताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून मराठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येते. सहशिक्षिका वारंवार पैशाची मागणी करत असल्याने मी कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे शिक्षक चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
याच शाळेतील सहशिक्षकेसोबत त्यांचे अनैतिक संबंध जुळून आले असल्याचा आरोप मृताच्या पत्नीने केला आहे. चव्हाण यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे.