मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आरोपी मॉरिस भाई याने शांत डोक्याने कट रचत घोसाळकर यांना संपवलं. त्यानंतर स्वत: वर गोळी झाडत आत्महत्या केली. या प्रकरणाने संपूर्ण दहिसर परिसरात खळबळ उडाली आहे. अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र होते. या प्रकरणात मॉरिस याचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याची पिस्तुल वापरली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे. बॉडीगार्ड मिश्राला सात दिवसांची पोलीस कोठडी दिली गेली आहे. त्यानंतर अमरेंद्र मिश्रा याची पत्नी सोनी मिश्रा यांनी गंभीर आरोप केले आहे. त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनाही विनंती केलीये.
माझ्या नवऱ्याला फसवण्यात आले आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते माझ्या नवऱ्याचा काही दोष नाही. पोलीस त्यांना नीट वागणूक देत नसून मारहाणसुद्धा करण्यात आली आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते माझ्या नवऱ्याचा यामध्ये काही दोष नाही. या प्रकरणामध्ये माझ्या पतीचं जाणीवपूर्वक ओढले जात असल्याचा आरोप सोनी मिश्रा यांनी केला आहे.
पोलिसांनी ७ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र आमच्या क्लायंटचा काहीही संबध नव्हता.ते फक्त त्यांच्याकडे कामाला होते. त्यांच्या बंदूकीचा परवाना ऑल इंडिया परमिट आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडीची मागणी आम्ही केली होती.मात्र त्यांना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याचं अॅडव्होकेट रेखा जयस्वाल यांनी म्हटलं आहे.
अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली तेव्हा मेहुलची आई करुणा रुग्णालयात एडमिट आहे, तिकडे अमरेंद्र मिश्रा गेले होते. आम्हाला घटनेची माहिती पोलिसांकडून रात्री 3 वाजता मिळाली होती त्यावेळी आम्हालाही धक्का बसला. मी स्वतः माझ्या पतीला पोलिसाकडे घेऊन गेले मात्र आता माझ्या पतीला भेटूही दिलं जात नसल्याचं सोनी मिश्रा यांनी टीव्ही9 मराठीसोबत बोलताना सांगितलं होतं.