चंद्रपूर : भरधाव वेगात आलेल्या कारने दोघांना उडवल्याची घटना काल रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरात घडली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. अपघाताची ही थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. अपघात प्रकरणी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनित तावडे असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. तर बंडू ढोले असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट ते सिंधी कॉलनी परिसरात काल रात्री साडेअकराच्या सुमारास एक भरधाव कार आली. गाडीचा वेग खूप असल्याने ती अनियंत्रित झाली. यादरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बंडू ढोले आणि ओम ईटणकर या दोघांना अनियंत्रित कारने उडवले.
अपघात एवढा भयानक होता की, यात बंडू ढोले याचा जागीच मृत्यू झाला. तर ओम ईटणकर हा गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट ते सिंधी कॉलनी जाणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावर हा अपघात झाला. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होते. पोलिसांनी कार चालक विनित तावडे याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.